पडू आजारी
रुग्णालयात दाखल असणाऱ्या, विशेषकरून वयस्कर व्यक्तींना, देता येतील असे काही पदार्थ नोंदवते आहे. सध्या या अनुभवातून जाते आहे. म्हणून लिहावंसं वाटलं.
रुग्णालयात असताना अनेकदा औषधांमुळे मळमळतं किंवा झोपून राहिल्यामुळे भूक लागत नाही. एका वेळी नेहमीइतकं खाल्लं जात नाही. तसंच वयस्कर व्यक्तींना दात नसले किंवा कवळी आहे पण लावायचा कंटाळा असेल तर काही पदार्थ चावता येत नाहीत. उदा. कांदेपोहे. पोहे जरा गार झाले की सहसा कोरडे पडतात. अशा लोकांना उपमा, सांजा, इडली, मऊ डोसा, मऊ भात, भाताची पेज, कण्हेरी असे पदार्थ असले तर खायला सोपे पडतात. तसंच उपमा, सांजा करताना त्यात भाज्या घालता येतात. मऊ भात किंवा कण्हेरी करताना त्यात तांदळाबरोबरच मुगाची डाळ घालावी, प्रथिनं मिळतात त्यातून. मी डाळतांदूळ धुऊन थोडे वाळवून लोखंडाच्या कढईत भाजून घेते. गार झाल्यावर मिक्सरला लावते. कण्हेरी करताना दोन मोठे चमचे ही पूड, वाटीभर पाणी, मीठ, हळद, चवीपुरतं तिखट आणि गाजर/भोपळा/दुधी/बीट किसून किंवा एखादी पालेभाजी घालून कुकरला दोन शिट्या काढते. खायला देताना पातळ हवं असेल तर पाणी घालता येतं. सूप, किंवा स्टाॅक किंवा वरणाचं पाणीसुद्धा चालेल. वरनं तूप हवंच. आवडत असल्यास लिंबू.
जेवणासाठी धिरडी किंवा मऊसर थालिपिठं हा उत्तम पर्याय आहे. मी ज्वारी, नाचणी, तांदूळ पिठं आणि पचत असल्यास बेसन आलटून पालटून वापरते धिरडी करताना. धिरड्याचं पीठ भिजवताना आमटी किंवा वरण वापरता येतं पाण्याऐवजी. त्यात कोबी, गाजर, मुळा, काकडी वगैरे किसून घालता येतात. तसंच कोथिंबीर, पालक, मेथी, आदि बारीक चिरून घालता येतात. बाकी आवडीनुसार लसूण, हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालावं. ओवा, जिरं, आवडीनुसार घालता येईल. धिरडी जाडसर किंवा पातळ जाळीदार कशीही करता येतात. दात चांगले असतील तर याच पिठाची थालिपिठं लावता येतील. यासोबत आंबट गोड लिंबू लोणचं देता येतं. शक्यतो तेलकट तिखट आंबट लोणची चटण्या देऊ नयेत.
सूप हाही चांगला पर्याय आहे. पोटभरीचा आणि पौष्टिक. शिवाय यातील फायबरमुळे पोट साफ राहायला मदत होते, जे अनेकदा झोपून राहिल्याने साफ होत नाही. माझ्याकडे सूपमेकर आहे त्यात मी वेगवेगळ्या भाज्यांची सूप करते. सूपमेकरचा मोठा फायदा हा की यात सूप गाळावं लागत नाही त्यामुळे फायबर काढून टाकले न जाता पोटात जातात.
मी गेल्या आठवड्यात सूप केलं तीनदा त्यात लाल भोपळा, बीट, गाजर, टोमॅटो, कांदा या भाज्या घातल्या होत्या. एकदा मक्याचे दाणे घातले होते. यात दुधी, पालक, भोपळी मिरची, काकडी वगैरे भाज्याही घालता येतात. मी थोडं आलंलसूणही घालते, आणि मीठमिरपूड. आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार काहीही कमीजास्त करता येतं. सूप एकदा केलं की दोन दिवस तरी नक्की देता येतं, फ्रिजमध्ये ठेवायचं आणि देताना गरम करून थरमाॅसमधनं न्यायचं. सूपबरोबर भातही खाता येतो. ब्रेड आवडत असेल तर तोही बुडवून खाता येतो.
आमटीभात, कढीभात, हे पदार्थही द्यायला चांगले. सोबत एखादी मऊ शिजलेली भाजी देऊ शकतो. आमटीसाठी डाळ लावताना त्यात भाजी घालता येते एखादी किंवा नंतर फोडणीला टाकताना पडवळ, मुळा, फ्लाॅवर असं काही घालता येतं.
मी अनेक भाज्यांचं रायतं करते दह्यातलं. भोपळ्याचं भरीत करतो तसंच. पडवळ, दुधी भोपळा, गाजर, तोंडली, इ. भाज्या कुकरात शिजवून मऊ करून दह्यात कालवायचं. मीठ, साखर, मिरपूड, जिरेपूड आवडीनुसार. आवडत असल्यास तूपजिरं वा तेलमोहोरी फोडणीही देता येते.
मऊ खिचडी हा तर एरवीही अनेकांच्या आवडीचा पदार्थ. यातही वेगवेगळ्या भाज्या घालता येतात. होतोही पटकन.
दात नसले तरी अनेकांना तळलेला पापड, मिरगुंडं चघळता येतात, त्याची चव हवीशी वाटते. त्या नादाने जेवण दोन घास जास्त जातं. दोन दिवसांतनं एकदा अर्धा पापड किंवा तीनचार मिरगुंडं द्यायला हरकत नसावी, अर्थात बीपी हाय असेल तर हे देता येणार नाही. खिचडीवर ताजं पनीर कुस्करून घालता येतं. ते शिजवायची गरज नसते.
अंडं आवडत असेल आणि चालत असेल तर उकडून वा हाफ फ्राय/आॅमलेट असं देता येईल. (मी मांसाहारी पदार्थ करत नाही, त्यामुळे त्याबद्दल लिहू शकत नाही.)
तांदूळ, नाचणी, ज्वारीच्या पिठाची ताकातली उकड खायला सोपी, पचायला हलकी, आणि पोटभरीची असते.
बटाटा, कच्ची केळी, सुरण, अरवी/अळकुडी उकडून मीठ लावून खाता येतात. किंवा तेल चालत असल्यास परतून काप करता येतात. रताळं उकडून नुसतं खाता येतं किंवा दुधात घालून खिरीसारखं करता येतं.
दुधी, कोबी, मेथी इत्यादि घालून ज्वारीच्या पिठाचे मुटके करता येतात. तेल खायचं नसेल तर ते फक्त वाफवूनही चांगले येतात. किंवा कमी तेलात परतून खाता येतात. हेही पौष्टिक आणि पोटभरीचे होतात.
फळं चालत असतील, पचतील, आवडतील तशी देतोच आपण. दात नसतील तर वेलची केळी, चिकू, पपई सगळ्यात सोपी. दात असतील तर सफरचंदं, स्ट्राॅबेरी, मोसमानुसार. संत्रीमोसंबी आंबट नाहीत ना हे पाहून द्यावी लागतात.
नारळाचं पाणी देता येतं परंतु ते डाॅक्टरांना विचारूनच द्यावं. अनेक जणांना ते पिऊन सर्दी होते. दूध आवडत असेल आणि पचत असेल तर घरी मिल्कशेक करता येतील किंवा अमूलचं फ्लेवर्ड दूध आणता येईल. दहीताकही पचत असेल, एरवी रोजच्या जेवणाचा भाग असेल, तर घरी लावून ताजं देता येईल.
आजारी माणसाचं जेवण अगदी सपक नसावं. आधीच औषधांमुळे तोंडाची चव गेलेली असते, त्यात अळणी जेवण असेल तर फार खाल्लं जात नाही आणि तब्येत सुधारायला वेळ लागतो. चविष्ट म्हणजे मसालेदार नव्हे. आजारी व्यक्तीला पचतील असेच पदार्थ करावेत पण त्यांच्या वासाने भूक चाळवली गेली तर उत्तम. रंगसंगतीही विचार करून चांगली ठेवता येते. तसंच पदार्थ गरम राहतील असे डबे, थरमाॅस वापरावे.
घरातली एक व्यक्ती रुग्णालयात असते तेव्हा घर त्याभोवती फिरत असतं. स्वयंपाक, रुग्णाला डबे पोचवणं, आणणं, घरातल्या इतर सदस्यांची सोय, झोपायला जाणं, डाॅक्टरांशी संवाद आणि रुग्णाबद्दलची चिंता अशा अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. अशा वेळी काय करावं हे पटकन लक्षात येत नाही म्हणून हे लिखाण. यात तुम्ही तुमची भर नक्की घाला.
खूप उपयोगी आहे. खरंच वेळेवर सुचत नाही.
ReplyDeleteधन्यवाद काकू.
Deleteछान उपयुक्त माहिती .धन्यवाद 🙏
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteThanks
ReplyDeleteThank you for reading.
Delete