हिवाळ्यातले पदार्थ
डिसेंबरात लिंबं चांगली येतात बाजारात, पातळ सालीची आणि स्वस्त. त्यामुळे लोणचं करायलाच हवं. मिरच्याही चांगल्या असतात, मग त्याचंही लोणचं करावं.
खाराच्या मिरच्या
खाराच्या मिरच्या हमखास पाकसिद्धी पुस्तकात आहेत तशा. त्या भन्नाट चविष्ट होतात, अनेक वर्षांचा अनुभव आहे. पाव किलाे मिरच्या चिरून घ्यायच्या. छोट्या कढल्यात एक चमचा तेलावर एक चमचा मेथीदाणे आणि नंतर २ चमचे हिंग पूड भाजून घ्यायची. एक वाटी लिंबाचा रस घ्यायचा. पाव वाटी मोहरीची डाळ, हळद, आणि थोडा लिंबाचा रस असं मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. मग त्यात उकळून गार केलेलं पाणी थोडं थोडं करत घालत फेसून घ्यायचं मिक्सरमध्येच. हलकी झाली की हे मिश्रण मिरच्यांच्या फोडींवर घालायचं. त्यात उरलेला लिंबाचा रस, अर्धी वाटी मीठ, मेथीहिंग, घालून कालवायचं. मग अर्धी वाटी तेल गरम करून गार झाल्यावर ओतायचं. नीट कालवायचं. आठेक दिवस तरी रोज कालवावं लागतं. यात लिंबू, मीठ नंतर वाढवता येतं. इतकंच काय खार जास्त झाला तर मिरच्यांचे तुकडेही वाढवता येतात. मी सहसा छोटी बाटली रोज वापराला बाहेर ठेवते, बाकी फ्रिजात. वापरायला काढताना पुन्हा हवं असल्यास तेल घालता येतं. आमच्याकडे ही मिरची इतर लोणच्यांपेक्षा जास्त खपते.
लिंबाच्या लोणच्याचा जरा जुगाड केला आहे. खाराच्या मिरच्यांसाठी लिंबं पिळून झाली होती, सालं टाकून द्यायला जिवावर आलं. मग त्यातल्या बिया काढल्या, थोड्या बारीक फोडी केल्या. आणखी तीनचार रस असलेली लिंबं पण बिया काढून त्यात घातली. सातआठ हिरव्या मिरच्या आणि या लिंबाच्या फोडी सगळं मिक्सरला वाटलं. अगदी बारीक नाही केलं. तीन आवळे आणि बोटभर ओली हळद होती, तीही किसून यात घातली. मीठ साखर घालून नीट कालवून उन्हात ठेवलंय.
Comments
Post a Comment